Bank Holidays in March 2023 : मार्च महिन्यात १२ दिवस बँकांना राहणार सुट्टी
पाहा सुट्ट्यांचे कॅलेंडर..
मार्चच्या सुट्ट्यांचे कॅलेंडर प्रसिद्ध झाले आहे. सर्व खातेदारांनी बँकेत जाण्यापूर्वी या सर्व सुट्ट्यांचा आढावा घेणे आवश्यक आहे, जेणेकरून खातेदारांचे कोणतेही काम थांबणार नाही. मार्चमध्ये बँकांना किती दिवस टाळे राहणार आहे, घ्या जाणून..
चॅटजीपीटी ' आणि आपले भविष्य.(लेख)
*सचिन* *दिवाण** सरांचा लेख आहे
सॅम आल्टमान यांच्या 'ओपनएआय' या कंपनीने विकसित केलेल्या 'चॅटजीपीटी' या 'व्हर्चुअल रोबो' किंवा 'चॅटबॉट'ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स - 'एआय') क्षेत्रातील ही प्रणाली बाजारात येऊन दोन महिनेही उलटले नाहीत तोवर तिला 'गुगल किलर' असे संबोधले जाऊ लागले आहे. तिच्या आगमनाने गुगलच्या शेअर्सच्या किंमतींवर यापूर्वीच परिणाम होऊ लागला आहे. भविष्यात मानवी जगतात आमूलाग्र आणि तुफान बदल घडवण्याची क्षमता तिच्यात आहे, असे मानले जात आहे.
सहज गंमत म्हणून गेल्या आठवड्यात 'चॅटजीपीटी' वापरून बघण्याची संधी मिळाली. तेव्हाच तिच्याबद्दल प्रथम ऐकले आणि अधिक माहिती घेत गेलो. जे समजले आणि करून पाहिले त्याने थक्क होत गेलो.
शाळा-कॉलेजात असताना माहितीसाठी त्या-त्या विषयांतले तज्ज्ञ, पुस्तके-विश्वकोश-ग्रंथालयांवर अवलंबून होतो. नंतर ती जागा गुगलने घेतली. गुगल म्हणजे आपल्या स्मरणशक्तीचे 'एक्स्टेंन्शन'च बनले होते. त्यामुळे पूर्वी ज्या गोष्टी हमखास लक्षात असायच्या त्या साध्या-साध्या गोष्टी आता लक्षात ठेवल्या नाहीत तरी चालू लागले. गरज भासेल तेव्हा गुगल ती माहिती क्षणार्धात सादर करत होते.
मात्र गुगलची मर्यादा अशा होती की, ते केवळ उपलब्ध साठ्यातील माहिती काढून देऊ शकते. त्याच्याजवळ असलेल्या माहितीवर प्रक्रिया करून ती वेगवेगळ्या स्वरूपांत सादर करू शकत नाही. म्हणजे, गुगलला निबंध लिही किंवा कविता कर, असे सांगितले तर ते करू शकत नाही. त्यासाठी संगणकाकडे किंवा यंत्रमानवाकडे कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स - 'एआय') असणे गरजेचे होते. नेमके हेच काम 'ओपनएआय' या कंपनीने 'चॅटजीपीटी'च्या माध्यमातून केले आहे. त्याला २०२१ सालापर्यंतचा डेटा फीड करण्यात आला आहे. त्या आधारावर 'चॅटजीपीटी' अनेक कामे करू शकते.
सुरुवातीला केवळ माहिती देण्यासंबंधी काही प्रश्न 'चॅटजीपीटी'ला विचारून पाहिले. त्याने त्यांची उत्तरे अगदी लीलया दिली. मग थोडे अवघड प्रश्न विचारले. ते ही त्याने पटकन सोडवले. संगणक किंवा यंत्रमानव सहसा 'रिपिटिटीव्ह टास्क्स' सहजपणे करतात. त्यांना 'क्रिएटिव्ह' किंवा मानवी भावभावनांसंबंधी कामे जमत नाहीत. म्हणून त्या गोष्टी करून पाहिल्या. तर 'चॅटजीपीटी'ने तेही काही सेकंदांत करून दाखवले.
सचिन तेंडूलकरसंबंधी कविता कर म्हटल्यावर २-३ सेकंदांत ती करून दाखवली. आता ती कविता शशी थरूर यांच्या शैलीत कशी करशील म्हटल्यावर तेही केले. मग म्हटले की, ही कविता शेक्स्पिअरने कशी केली असती, तर तेही केले.
एका विषयावर निबंध लिहून दाखवला. त्याचे काही ओळींमध्ये संपादन कर म्हटल्यावर तेही केले. मग म्हटले आता जरा जास्त क्रिएटिव्ह काम सांगून बघू. समज, एका आईस्क्रीम ब्रँडसाठी जाहिरातीची कॉपी लिहून दाखव म्हणून सांगितले. तर त्याने ते पण केले. आता ही कॉपी पश्चिम महाराष्ट्रासाठी 'कस्टमाइज' कर म्हटल्यावर त्यात त्याने मसाला फ्लेवर्ड आईस्क्रीम यांसारखे अस्सल कोल्हापुरी शब्द टाकले. मग त्याला तीच कॉपी पश्चिम बंगालसाठी 'कस्टमाइज' कर म्हटले तर त्याने त्यात मिष्टी, रोशोगुल्ला असे शब्द घालून मजकूर लिहून दाखवला.
मग म्हटलं की, आता जरा भावना आणि डोक्याचं काम देऊन बघू या. 'चॅटजीपीटी'ला विचारलं...समज, गावाकडे माझी आई अगदी शेवटच्या टप्प्यात आजारी (टर्मिनली इल) आहे. मला शहरातील नोकरीतून अर्जंट रजा घेऊन गावाला जायचं आहे. बॉस रजा द्यायला काचकूच करतोय. अशा परिस्थितीत नोकरीचा राजीनामा देऊन गावाकडे जाऊ का....तर 'चॅटजीपीटी'ने एकदम समंजसपणे उत्तर दिले - आई आजारी आहे ही गंभीर समस्या आहे. पण नोकरीही महत्त्वाची आहे. त्यासाठी राजीनामा देण्याचा आततायीपणा करण्याची गरज नाही. बॉसबरोबर बोलून काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. सोबत काही शक्यतांची यादीही दिली. बरं, रजेचा अर्ज लिहून दे म्हटलं तर तेही केलं. त्यात कारणांनुसार बदलही करून दाखवले.
आता जरा धीर चेपला. मग त्याला सर्दी-खोकला अशा सामान्य आजारांवर औषधे काय घ्यावीत ते विचारलं. तर त्याने तेही सांगितलं.
इतकेच नाही, तर सध्या अनेक सॉफ्टवेअर इंजिनिअर्स चॅटजीपीटीवर काही प्रोजेक्ट्ससाठी कोड्स लिहून घेत आहेत आणि त्याने लिहिलेले कोड्स वापरून बघितल्यावर ते प्रोजेक्ट्स काम करत आहेत, अशीही माहिती समजली.
सुरुवातीला गंमत वाटत होती. पण आता मात्र हे प्रकरण अवघड असल्याचं लक्षात आलं. म्हणजे लक्षात घ्या. हे कोणा-कोणाला घरी पाठवू शकते.
कारकून, लेखक, कवी, पत्रकार, संपादक, शिक्षक, वकील, जाहिरात क्षेत्रातील कॉपी-रायटर्स, संगणक क्षेत्रातील कोड रायटर्स, लहानसहान डॉक्टर्स (जीपी - जनरल प्रॅक्टिशनर्स) इ. इ.... जाणार सगळे घरी. जातील त्यांची कामे भविष्यात.
सध्या 'चॅटजीपीटी'ला केवळ २०२१ पर्यंतचा डेटा दिला आहे. भविष्यात त्याला थेट गुगलसारख्या डेटाबेसला लाइव्ह जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या 'चॅटजीपीटी' केवळ शब्द प्रोसेस करू शकते. भविष्यात ते चित्रे, ऑडिओ, व्हिडिओ आदी प्रकारची माहिती प्रोसेस करू लागेल आणि त्या स्वरूपांत माहिती सादर करू लागेल. म्हणजे आज केवळ लेखक, कवी घरी जातील. उद्या चित्रकार, संगीतकार, दिग्दर्शक घरी जाऊ लागतील.
तसं पाहिलं तर हा काही अचानक बसलेला धक्का नाही. गेली अनेक वर्षे अनेक शास्त्रज्ञ, विज्ञान लेखक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यातील वापरासंबंधी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भल्या-बुऱ्या शक्यतांविषयी लिहित-बोलत होते. संगणक आणि यंत्रमानवांना कृत्रिम बुद्धिमत्ता प्रदान केली, ते आपले आपण शिकू लागले (डीप लर्निंग, मशिन लर्निंग वगैरे) तर ते त्यांची निर्मिती करणाऱ्या मानवालाच डोईजड बनतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. जिथे फारशी बुद्धी वापरावी लागत नाही, अशी रिपिटिटीव्ह कामे, कारखान्यांतील धोकादायक किंवा घाण कामे संगणक आणि यंत्रमानवांकडे जातील हे माहीत होते. पण आजवर तो धोका दूर कोठेतरी क्षितिजावर असल्यासारखा वाटत होता. 'चॅटजीपीटी'ने ती शक्यता उंबरठ्यावर आणून ठेवली आहे.
'सेपियन्स', 'होमो डिऑस' यांसारख्या गाजलेल्या पुस्तकांचे लेखक युवाल नोआ हरारी यांनी आणि तशा अनेक जणांनी याबद्दल लिहून ठेवले आहे. आज माणूस करत असलेली अनेक प्रकारची कामे भविष्यात संगणक आणि यंत्रमानव करू लागतील. अगदी उच्च कोटीची बुद्धिमत्ता, भावना आणि क्रिएटिव्हिटी आदी गोष्टींची गरज असलेली कामेच माणसांकडे राहतील. सर्वसामान्य माणसे ती कामे करू शकणार नाहीत. मग हजारोंच्या संख्येने लोकांच्या नोकऱ्या जातील. बेकारांच्या झुंडीच्या झुंडी तयार होतील.
सामान्य परिस्थितीतच 'युथ सरप्लस इज इक्वल टू पीस डेफिसिट' - बेरोजगार तरुणांची भाऊगर्दी म्हणजे शांततेचा अभाव - असे म्हटले जाते. त्यात अशा लाखो बेरोजगारांची भर पडली तर काय होईल, याची कल्पनाच केलेली बरी. या बेरोजगारांना नीट हाताळले नाही तर ते हिंसक होऊ लागतील. समाजाचे स्वास्थ्य बिघडेल. समाजाची संपूर्ण घडीच विस्कटली जाईल. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय, कायदा-सुव्यवस्था यंत्रणांवर प्रचंड दबाव येईल. आपल्या सर्वच नेत्यांची आणि या यंत्रणांची आजची स्थिती पाहता त्यांना हे आव्हान झेपेल, असे वाटत नाही. देशोदेशी निदर्शने, आंदोलने, उठाव इतकेच नव्हे तर क्रांती होऊ लागतील.
ऑल्वीन टॉफलरसारख्या भविष्यवेधी लेखकांनी म्हटले होते की, मानवी इतिहासात केवळ तीनच क्रांती झाल्या - शेती, उद्योगधंदे आणि आधुनिक तंत्रज्ञान. प्रत्येक क्रांतीने मानवी जीवन आमूलाग्र बदलले. शिकार करणाऱ्या आणि फळे-कंदमुळे गोळा करून खाणाऱ्या माणसाला शेतीचा शोध लागला आणि नद्यांच्या किनाऱ्यांनी संस्कृती बहरल्या. ही व्यवस्था शेकडो वर्षे टिकली. नंतर औद्योगिक क्रांतीने जग बदलले. आणि आता गेल्या ५०-६० वर्षांत संगणक, जैवतंत्रज्ञान, नॅनोतंत्रज्ञान, रोबोटिक्स, आर्टिफिशियन इंटेलिजन्स, व्हर्चुअल रिअॅलिटी, इंटरनेट ऑफ थिंग्ज आदी बाबींनी तिसरी क्रांती घडवली आहे. आता दर पाच-दहा वर्षांनी जग बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पहिली अॅग्रेरियन रेव्होल्युशन, दुसरी इंडस्ट्रिअल रेव्होल्युशन आणि तिसरी नॉलेज-बेस्ड रेव्होल्युशन. या तिन्ही क्रांतींनी माणसाची जगण्याची पद्धत मुळापासून बदलली. प्रत्येक वेळी उत्पादनाची साधने (फॅक्टर्स ऑफ प्रॉडक्शन) बदलत गेली. शेतीवर आधारित अर्थव्यवस्थेत जमीन, पाणी, श्रम (माणसे किंवा जनावरे) आदी उत्पादनाची प्रमुख साधने होती. औद्योगिक जगतात त्यात कोळसा, लोखंड, वीज, भांडवल आदींची भर पडली. आता ज्ञानाधिष्ठित समाजात उच्च तंत्रज्ञान आणि मानवी बुद्धिमत्ता यांना अपार महत्त्व लाभले आहे.
उत्पादनाची साधने आणि पद्धती बदलल्या तशा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्थाही बदलल्या. शेतीवर आधारित व्यवस्थेत एकत्र कुटुंब पद्धती होती. राजेशाही आणि सरंजामी राज्यव्यवस्था होती. औद्योगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावर कामगारवर्ग तयार झाला. खेड्यांतून शहरांकडे स्थलांतर वाढले. चौकोनी कुटुंबे तयार झाली. सामाजिक व्यवस्थेप्रमाणे राजकीय व्यवस्थाही बदलली. लोकशाही, भांडवलशाही आणि साम्यवादी-समाजवादी राजकीय व्यवस्था निर्माण झाल्या.
आता पुन्हा उत्पादनाची साधने आणि आर्थिक व्यवस्था बदलत आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढणार आहे. हाताला काम नसणाऱ्या जनतेचे प्रश्न हाताळण्यास कदाचित जुनी शासनव्यवस्था कुचकामी ठरणार आहे. त्यातून बहुतेक नवीन, पूर्णपणे वेगळी राजकीय प्रणाली निर्माण होऊ शकते.
नव्या जगाचे प्रश्न नवे आहेत. जुन्या राजकीय व्यवस्थेला ते समजून घेऊन सोडवता येतीलच याची काही खात्री देता येत नाही. देश जेवढा अधिक तंत्रज्ञानावर अवलंबून असेल तेथे तितक्याच लवकर ही परिस्थिती निर्माण होईल. अन्य जगात हळूहळू ही परिस्थिती पाझरत जाईल. पाश्चिमात्य जगात लोकशाही आली ती शिक्षणाचा बऱ्यापैकी प्रसार आणि सामाजिक जाणीवा प्रगल्भ झाल्यानंतर आली. जिथे साम्यवादी व्यवस्था आल्या तिथे जुनी सरंजामी व्यवस्था नष्ट केली गेली.
पण भारतासारख्या देशांत ना सामाजिक जाणीवा प्रगल्भ झालेल्या दिसतात, ना जुनी सरंजामी व्यवस्था पूर्णपणे नष्ट झालेली दिसते. पूर्वी गावोगाव जे सरंजामदार, धनदांडगे होते तेच आजचे नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री-संत्री झालेले दिसतात. त्यामुळे जुनी सरंजामी व्यवस्था न संपता तिचे केवळ स्थित्यंतर (ट्रान्सफॉर्मेशन) झालेले दिसते. ही बाब लोकशाहीसाठी घातक आहे. त्या अर्थाने
भारतात जी काही राजकीय व्यवस्था आहे तिला खरी लोकशाही (डेमोक्रसी) न म्हणता 'इलेक्टिव्ह क्लेप्टोक्रसी' (मतपेटीतून आलेली झुंडशाही) म्हणता येईल. आणि ही बाब आज झालेली नाही. स्वातंत्र्यापासून तीच यंत्रणा चालत आलेली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे हे सर्वपक्षीय राजकारणी अजूनही जात-धर्म-भाषा-प्रांत-अस्मिता असल्या नादान राजकारणात गुंतलेले आहेत. त्यातील एकालाही नव्या जगाच्या या प्रश्नांची किमान जाण असल्याचे दिसत नाही. त्यांची सोडवणूक करणे फार दूरची गोष्ट झाली. तेव्हा आपल्या भविष्याचा नुसता विचार केलेला बरा.
..............................
कोई टिप्पणी नहीं: